आजच्या जगात परवलीचे शब्द ठरलेल्या व्यवस्थापन, प्रशासन, जागतिकीकरण, आर्थिक धोरणं यांमधील अनेक मूलतत्वांची प्राचीन, पौराणिक, ऐतिहासिक घटनांशी व दंतकथांशी सुयोग्य सांगड घालता येते. व्यवस्थापनाची बहुतांश सगळीच तत्त्वं पुरातनकाळात भारतात वापरली जात होती.
प्रभू रामचंद्र रावण वधानंतर अयोध्येत परतले तेव्हा राज्याची घडी व्यवस्थित बसवण्यास त्यांनी न्यायदेवतेस अदृश्य रूपात वजनकाट्यावर बसवून व्यापारीवर्गास तराजूत योग्य ते द्रव्य करापोटी भरायला सांगितलं आणि त्यातूनच साकारलेली रामराज्याची कल्पना अर्थशास्त्राच्या पब्लिक फायनान्सच्या थिअरीमध्ये सापडते.
राजा भरत स्वतःला तीन मुलगे असूनही त्यांना दूर करून राष्ट्रहितासाठी भारद्वाज ऋषींच्या भूमन्यू नावाच्या मुलाला भारतवर्षाच्या सम्राट पदावर बसवू शकला. एकलव्य तर स्वयंप्रगती व उद्दिष्टं ठेऊन काम करणं या तत्वप्रणालीचा प्रणेताच म्हणायला हवा. अजूनही जनमानसावर स्वतःची अफाट प्रतिमा टिकवून ठेवलेल्या श्रीकृष्ण चरित्राचा अभ्यासही कायमच मार्गदर्शक ठरावा असा आहे.
प्राचीन कथांतून शिकायला मिळतो तत्कालीन लोकांनी केलेला बुद्धीचा सुयोग्य वापर, युक्तिवाद व परिस्थितीजन्य प्रश्नांवर यशस्वीपणे केलेली मात.
व्यवस्थापनाची व्याख्या देणाऱ्या मेरी पार्कर फॉलेटला तरी काय माहिती असणार की, हजारो वर्षांपूर्वीच व्यवस्थापनाची सारी सूत्रं भारतात समर्थपणे वापरली गेली होती.
डॉ. विनय भोळे यांनी संशोधनपूर्वक घातलेली प्राचीन भारतीय कथा आणि त्यातील आधुनिक व्यवस्थापन यांची सांगड वाचकांना विस्मयकारी जगात नेऊन सोडते.